मध्य पूर्वेत सध्या अत्यंत गंभीर आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सुरू झालेले युद्ध आता पाचव्या दिवशी पोहोचले आहे. परंतु हा संघर्ष आता फक्त तीन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आज या युद्धाची ज्वाला संपूर्ण मध्य पूर्वेत पसरत आहे. सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात, कतार, बहारीन, ओमान, लेबनॉन, इराक आणि जॉर्डन अशा अनेक देशांमध्ये तणाव वाढला आहे. तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.
इराणने जगातील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग असलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्याची धमकी दिली आहे. आणि त्यामुळे जगभरात भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षाची सुरुवात अचानक झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून इराणमध्ये गंभीर आर्थिक आणि राजकीय संकट सुरू होते. २०२५ ते २०२६ दरम्यान इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन झाले. महागाई वाढली, चलन म्हणजेच रियालची किंमत घसरली, बेरोजगारी वाढली आणि लोक रस्त्यावर उतरले. सरकारने हे आंदोलन कठोरपणे दडपले. अनेक ठिकाणी पोलिस आणि लष्कराने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केला. हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर दबाव वाढवला.
फेब्रुवारी २०२६ मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात अणुकराराबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेसाठी ओमानने मध्यस्थी केली होती. परंतु २६ फेब्रुवारी रोजी स्वित्झर्लंडमधील जीनेव्हा येथे झालेल्या चर्चेची तिसरी फेरी अपयशी ठरली. अमेरिकेची प्रमुख मागणी होती:
- इराणने आपली प्रमुख अणु केंद्रे बंद करावीत
- नाटांझ, फोर्डो आणि इस्फहान येथील अणु सुविधा नष्ट कराव्यात
- युरेनियमचा साठा आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली द्यावा
- बॅलिस्टिक मिसाइल कार्यक्रम बंद करावा
इराणने या अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. आणि त्यानंतर केवळ दोन दिवसांत परिस्थिती पूर्णपणे बदलली.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली. या कारवाईला नाव देण्यात आले — ऑपरेशन एपिक फ्यूरी. अमेरिकन आणि इस्रायली लढाऊ विमानांनी इराणमधील अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. परंतु या हल्ल्याचे सर्वात मोठे लक्ष्य होते — इराणचे नेतृत्व.
या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तेहरानमधील नेतृत्व कंपाऊंड, लष्करी मुख्यालय आणि अनेक वरिष्ठ अधिकारी लक्ष्य करण्यात आले. इराणच्या राज्य माध्यमांनी १ मार्च रोजी खामेनी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली. यानंतर संपूर्ण देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक, ७ दिवसांची राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली. इराणी रेड क्रिसेंटच्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ७०० नागरिक आणि सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. अमेरिकेच्या बाजूने ६ सैनिक मारले गेल्याची माहिती आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते, इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या दिशेने वेगाने जात होता आणि ते थांबवणे आवश्यक होते. ट्रम्प यांनी सांगितले “हे आमची शेवटची आणि सर्वोत्तम संधी आहे. आम्ही इराणची मिसाइल क्षमता आणि नौदल कमकुवत करत आहोत.” त्यांनी हे युद्ध ४ ते ५ आठवडे किंवा त्याहून अधिक काळ चालू शकते असेही संकेत दिले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही सांगितले की “सगळ्यात कठीण लष्करी कारवाया अजून बाकी आहेत.” इराणने या हल्ल्याला तात्काळ प्रत्युत्तर दिले. इराणने शेकडो बॅलिस्टिक मिसाइल्स आणि ड्रोन इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर सोडले.
इस्रायलमध्ये काही शहरांवर हल्ले झाले आणि सुमारे १० लोकांचा मृत्यू झाला. परंतु युद्धाचा सर्वात मोठा विस्तार लेबनॉन आणि गल्फ देशांमध्ये झाला.
इराण समर्थित हिजबुल्लाह संघटनेने इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर रॉकेट आणि ड्रोन हल्ले केले. याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये जमिनीवरील लष्करी कारवाई सुरू केली बेरूतच्या उपनगरांवर हवाई हल्ले केले या हल्ल्यात हिजबुल्लाहचा एक वरिष्ठ कमांडर मारला गेल्याचे सांगितले जाते. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील ८० पेक्षा अधिक गावांतील लोकांना परत येऊ नका असा इशारा दिला आहे. सुमारे ३० हजार लोक बेघर झाले आहेत. इराणने अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या देशांनाही लक्ष्य केले. यामध्ये UAE,
दुबई आणि अबूधाबी येथे ड्रोन आणि मिसाइल हल्ले झाले.
एक व्यक्ती मृत आणि ६८ जखमी झाले. कतार, दोहा जवळ हवाई संघर्ष झाला. कतारच्या हवाई दलाने इराणचे काही लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. बहारीन, अमेरिकेच्या पाचव्या नौदल तळावर मिसाइल हल्ला झाला. ओमान, तेल टँकरवर ड्रोन हल्ला झाला. कुवेत, अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. या परिस्थितीमुळे अमेरिकेने मध्य पूर्वेतील १४ देशांमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तातडीने बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. अनेक दूतावासातील कर्मचारी परत बोलावण्यात आले आहेत.
या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम जागतिक तेल बाजारावर झाला आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्याची धमकी दिली आहे. हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जगातील जवळपास २० टक्के तेल वाहतूक या मार्गाने होते. या मुळे तेल वाहतूक दरही विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम आशियातील देशांवर होऊ शकतो, विशेषतः भारत, चीन आणि दक्षिण कोरिया.
या युद्धामुळे जगभरात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी तातडीने युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. चीनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पाकिस्तानमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ हिंसक निदर्शने झाली. या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही दिसत आहे. युरोपियन शेअर बाजार सुमारे २.८ टक्के घसरला डॉलर मजबूत झाला, सोन्याच्या किमती वाढल्या, संरक्षण उद्योगातील कंपन्यांचे शेअर्स वाढले
सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे — हे युद्ध किती मोठे होणार? अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता मध्य पूर्वेतील मोठ्या युद्धात बदलण्याची शक्यता आहे. या संघर्षाचा परिणाम केवळ त्या प्रदेशापुरता मर्यादित राहणार नाही. तो जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही मोठा प्रभाव टाकू शकतो. जगभरातील देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पुढील काही दिवस या युद्धाच्या भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात. तज्ञांच्या मते वेळीच या युध्य पिपासू देशांना आळा घातला गेला नाही तर हे जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटू शकते. मात्र या मांजर आणि बोक्यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?









