मराठी चित्रपटसृष्टी नेहमीच हसणं, भावनिक गुंतवणूक आणि नात्यांमधली बारकावे उलगडणाऱ्या कथा देत आली आहे. अशाच एका निखळ आणि हृदयाला भिडणाऱ्या प्रवासाची मेजवानी घेऊन येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘ऑल इज वेल’, जो २७ जून २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
“तीन तिघाडा काम बिघाडा” ही ओळखलेली म्हण यावेळी मात्र नव्या अर्थाने, खळखळून हसवणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या गोष्टीसाठी वापरली जाणार आहे. अमर, अकबर आणि अँथनी – हे तिघे मित्र मुंबईमध्ये आपले भविष्य घडवण्यासाठी आलेले, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे त्यांच्या जगण्याला वेगळे वळण मिळते, आणि सुरू होतो एक मजेशीर पण भावनिक प्रवास.
या प्रमुख भूमिका साकारत आहेत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर – हे तिघे प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करत असून त्यांची जुळलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल. ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात मैत्रीचा खरा अर्थ अधोरेखित करणारी कथा सांगण्यात आली आहे – फक्त हसण्यापुरती मर्यादित नसलेली, तर आयुष्याची नवी दिशा दाखवणारी!
याशिवाय, चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर यांसारखे अनुभवी कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे योगेश जाधव यांनी, तर कथा व संवाद लिहिले आहेत प्रियदर्शन जाधव यांनी. निर्मितीची धुरा उचलली आहे वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स अंतर्गत अमोड मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर यांनी. तर निर्मिती व्यवस्थापन कुणाल निंबाळकर यांनी केले आहे.
संगीत दिग्दर्शन चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचं आहे. या मधुर संगीतात स्वररचना केली आहे रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांनी, तर गीतकार म्हणून मंदार चोळकर यांनी योगदान दिलं आहे.
तांत्रिक बाबतीतही ‘ऑल इज वेल’ मजबूत असून उत्कृष्ट छायांकन, संकलन, वेशभूषा आणि साहसदृश्यांमुळे या सिनेमाची रंगत आणखी वाढणार आहे.
एकंदरीत, ‘ऑल इज वेल’ हा सिनेमा प्रेक्षकांना हसवत हसवत मैत्री, भावना आणि आयुष्याच्या अनपेक्षित वळणांची गोड कहाणी सांगणार आहे.
