कॅनडा, 18 जून 2025 : कॅनडाच्या रॉकी पर्वतरांगात सुरु असलेल्या दोन दिवसीय G7 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती विशेष ठरली आहे. या परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी तसेच इतर जागतिक नेत्यांनीही सहभाग घेतला आहे.
कानानास्किस, अल्बर्टा येथे पार पडत असलेल्या या महत्त्वपूर्ण परिषदेदरम्यान ‘फॅमिली फोटो’साठी सर्व नेते एकत्र आले होते. मात्र, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात रंगलेल्या चर्चेमुळे इतर नेत्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. फोटोसाठी उभे राहण्यासाठी काही नेत्यांना लुला दा सिल्वा यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करावा लागला, कारण ते मेलोनी यांच्याशी संवाद साधण्यात व्यस्त होते.
या प्रसंगामुळे क्षणभर हास्याचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, परिषदेत जागतिक आर्थिक घडामोडी, युक्रेनमधील संघर्ष, हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता व आंतरराष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही उपस्थिती भारताच्या जागतिक पातळीवरील महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणारी ठरली आहे.
