चांगल्या शिक्षणासाठी योग” — आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री. हिरामण भुजबळ यांचे मार्गदर्शन
पिंपरी, २३ जून २०२५ –
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग विद्येचे गाढे अभ्यासक आणि योगशास्त्रतज्ज्ञ श्री. हिरामण निवृत्ती भुजबळ यांनी “चांगल्या शिक्षणासाठी योग” या विषयावर रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात चाटे क्लासचे विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन केले.
भुजबळ सरांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले की, “आज अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांच्या चित्ताचा स्थैर्य अभाव असल्यामुळे ते शिकवलेले लक्षात ठेवू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो.”
या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी महर्षी पतंजलींनी मांडलेला *“योगश्चित्तवृत्तीनिरोधः”* हा सूत्राचा संदर्भ दिला. “चित्तवृत्तिंना रोखणे म्हणजे योग” असे ते म्हणाले. जेव्हा मन स्थिर होते, तेव्हाच विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. भुजबळ यांनी पुढे सांगितले की, पतंजलींच्या अष्टांगयोगाचे — *यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी* — हे आठ अंग विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थैर्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. विशेषतः यम, नियम, प्रत्याहार आणि ध्यान यामुळे चित्त एकाग्र होते, स्मरणशक्ती वाढते आणि बौद्धिक क्षमता विकसित होते.
अशा प्रकारे, योगाच्या शास्त्रीय पद्धतीच्या अंगीकारामुळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे तर जीवनातील सर्वच क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते. त्यांनी हे देखील नमूद केले की अष्टांगयोगाच्या आचरणातून विद्यार्थी सुसंस्कृत, जबाबदार आणि देशाभिमानी नागरिक म्हणून घडू शकतात.
कार्यक्रमास चाटे क्लासचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी व्याख्यानाचे भरभरून स्वागत करत, योग दिनाचे खरे महत्त्व समजल्याचे समाधान व्यक्त केले.
