जालना, २१ फेब्रुवारी – आज दिनांक २१ रोजी जालना जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर १० वीच्या मराठी प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा काही प्रसारमाध्यमांद्वारे पसरवण्यात आली. या अफवेने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले. वर्षभर कठोर मेहनत करून विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली असताना अशा प्रकारच्या बातम्या समाजात अस्वस्थता पसरवणाऱ्या ठरतात.
या घटनेवर स्पष्टीकरण देताना जालना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सांगितले की, “असा कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडलेला नाही.” अधिक तपासाअंती समोर आले की, एका झेरॉक्स दुकानात काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे याच्या छापील प्रती विकल्या जात होत्या. मात्र, या प्रश्नांचा परीक्षा प्रश्नपत्रिकेशी काहीही संबंध नव्हता.
जिल्हाधिकाऱ्यांनी पालक व विद्यार्थ्यांना आश्वस्त केले असून सांगितले आहे की, “प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये.” तसेच प्रसारमाध्यमांना विनंती करण्यात आली आहे की, अशा संवेदनशील प्रकरणांची शहानिशा करूनच बातम्या प्रसारित कराव्यात, जेणेकरून समाजात अनावश्यक तणाव निर्माण होणार नाही.
विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहून आगामी परीक्षा आत्मविश्वासाने द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
