दिवाळीनंतर निवडणुकांचा बिगुल वाजणार
पुणे | ५ ऑगस्ट २०२५ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने स्पष्ट केले की, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दिवाळीनंतर घेतल्या जातील. राज्यात अनेक भागांत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे या निवडणुकांबाबतची उत्सुकता वाढली होती. मात्र, आगामी दिवाळी सण, शालेय परीक्षा, वादळी पावसाचा अंदाज आणि काही ठिकाणी अद्याप प्रलंबित असलेल्या आरक्षण प्रक्रियेमुळे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सद्यस्थितीत निवडणुका घेणे अनेक कारणांमुळे शक्य होणार नाही. सणासुदीचा काळ, शाळा-महाविद्यालयांचे वेळापत्रक, आणि प्रशासकीय तयारीचा अभाव लक्षात घेता, निवडणुका नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील. या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वातावरणातही हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांनी प्रचारासाठी प्रारंभिक तयारी सुरू केली असून, दिवाळीनंतर निवडणुकांचा जोरदार रणसंग्राम पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे अंतिम यादी निश्चित झाल्यानंतरच निवडणुकीची घोषणा करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. ही घोषणा सामान्य जनतेसाठी आणि इच्छुक उमेदवारांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. दिवाळीनंतर निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष सज्ज होत आहेत.
