
पुणे, दि. १४ नोव्हेंबर २०२५
पुणे शहरातील कात्रज बायपासवरील नवले ब्रिज पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरला आहे. काल पहाटे झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा नवले पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडे जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढील वाहनांना जोरदार धडक दिली. काही क्षणांतच चारचाकी, दुचाकी व बस अशा सुमारे ८ ते १० वाहनांचा चेन अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की काही वाहने रस्त्यावर उलटली, तर काहींना आग लागली. अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांमध्ये महिला व दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
नवले ब्रिज परिसरात याआधीही अनेक वेळा भीषण अपघात झाले आहेत. वाहने घसरून जाणे, ब्रेक फेल होणे किंवा उताराचा अंदाज न येणे या कारणांमुळे दरवर्षी अनेक बळी जात आहेत. आजपर्यंत या पुलावर झालेल्या अपघातांत एकूण ७५ हून अधिक जणांनी प्राण गमावले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे संताप व्यक्त करत, “हा पूल कायमस्वरूपी धोकादायक ठरत आहे. योग्य सिग्नल व्यवस्था, वेग मर्यादा आणि उतार नियंत्रण न केल्यास अजून बळी जातील,” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, महानगरपालिकेचे आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण व जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. मात्र उपाय योजना अजून सुचत नाही.











