News Information Entertainment

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर आलेले पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सँटीआगो पेना पलासिओस यांच्यात नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारताच्या दौऱ्यावर आलेले पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सँटीआगो पेना पलासिओस यांनी आज नवी दिल्लीत हैद्राबाद हाऊस इथं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. डिजिटल तंत्रज्ञान, कृषी, संरक्षण, रेल्वे, अवकाश तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संधींचा आढावा घेतला उभय नेत्यांंनी आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये दहशतवादाविरुद्ध एकत्र लढण्याची क्षमता आहे असं पंतप्रधान नरेन्द्र मोदी यावेळी म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष पेना यांचा हा भारतातील पहिला राजनैतिक दौरा असून, पराग्वेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षाचा हा दुसरा भारत दौरा आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि पराग्वे यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत होतील, अशी अपेक्षा आहे.

त्याआधी राष्ट्राध्यक्ष पेना यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पेना यांच्यातल्या चर्चेमुळे भारतासाठी पॅराग्वे आणि दक्षिण अमेरिका क्षेत्राशी संबंध वाढवण्याचे नवे मार्ग खुले होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. यावेळी  भारत आणि पॅराग्वे यांच्यात संयुक्त आयोग यंत्रणा  स्थापनेसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तत्पूर्वी राष्ट्राध्यक्ष पेना यांचं आज नवी दिल्ली विमानतळावर सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आलं आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आलं.

राष्ट्राध्यक्ष पेना यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. राष्ट्राध्यक्ष पेना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. मायदेशी रवाना होण्यापूर्वी ते येत्या बुधवारी मुंबई भेटीवर येणार आहेत. यावेळी प्रमुख राजकीय नेते, व्यापार आणि उद्योग प्रतिनिधी तसंच तंत्रज्ञांशी विविध महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचारविनिमय करणार आहेत.

भारत आणि पॅराग्वे यांच्यात १९६१ पासून मैत्रिपूर्ण संबंध आहे, दोन्ही देशांमध्ये व्यापार, कृषी, आरोग्य, औषध निर्माण, माहिती तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आहे. वाहन आणि औषध निर्माण क्षेत्रातल्या अनेक भारतीय कंपन्या पॅराग्वे इथं कार्यरत आहे. तर पॅराग्वेमधल्या कंपन्याही भारतात आर्थिक योगदान देत आहेत. दोन्ही देशांमध्ये संयुक्त राष्ट्रातील सुधारणा, हवामान बदल, अक्षय ऊर्जा आणि दहशतवाद विरुद्ध लढा यासंदर्भातल्या जागतिक स्तरावरच्या मुद्यांवर एकवाक्यता आहे.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा