पालघर जिल्ह्यातील अशोक धोडी अपहरण व हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी पाच महिन्यांनंतर अटकेत; पोलिसांच्या विशेष मोहिमेला यश
पालघर, ८ जून २०२५ —
तलासरी तालुक्यातील वेवजी काटीलपाडा येथे घडलेल्या अशोक धोडी अपहरण व हत्येप्रकरणात तब्बल पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अखेर पालघर पोलिसांनी आज सकाळी सिलवासा येथील मोरखल परिसरातून अटक केली. या कारवाईमुळे या खळबळजनक हत्येप्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय अशोक धोडी आणि आरोपी अविनाश धोडी हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांच्यात जमिनीच्या मालकी हक्कावरून दीर्घकाळ वाद सुरू होता. मनासारखा व्यवहार न झाल्यामुळे संतप्त होऊन अविनाश धोडीने आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने अशोक यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असून उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात काही पोलिस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत एक पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांना निलंबित केले असून आठ पोलिस अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी यांची बदली देखील करण्यात आली आहे.
या संदर्भात पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की, “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातला जाणार नाही. पोलिस दलाची विश्वासार्हता जपण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. आरोपी कोणताही असो, कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही.”
सध्या अटकेत असलेला अविनाश धोडी याच्याकडून पुढील तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून इतर फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पालघर जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
