२४ व २५ मार्च रोजी प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात चालणार मराठी चित्रपट महोत्सव…
पिंपरी, १९ मार्च २०२५ : ‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगृहात चित्रपट संकल्पने अंतर्गत मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. २४ मार्च ते २५ मार्च २०२५ याकाळात पिंपरी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे पोस्टर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते आज बुधवारी (१९ मार्च) प्रकाशित करण्यात आले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील, उप आयुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, मराठी चित्रपट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस कौस्तुभ कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी चित्रपट महोत्सवामध्ये ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’ असे विविध चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटांची निवड विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरातील प्रेक्षकांचा विचार करून करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
