पुणे, ५ ऑगस्ट २०२५: छत्रपती संभाजीनगर येथील एका २३ वर्षीय विवाहित तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील कोथरूड परिसरात आपल्या तीन मैत्रिणींकडे आश्रय घेतला होता. या तरुणीच्या सासरच्यांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा मोबाईल ट्रॅक करून तिचे लोकेशन पुण्यातील कोथरूड येथे शोधून काढले. त्यानंतर, संभाजीनगर आणि कोथरूड पोलिसांनी संयुक्तपणे त्या तरुणीला आणि तिच्या तीन मैत्रिणींना कोथरूड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले. मात्र, या प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी या तरुणी आणि तिच्या मैत्रिणींवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
संबंधित तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील तिच्या मैत्रिणींकडे एका दिवसासाठी राहण्यास आली होती. तिच्या सासरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली, आणि संभाजीनगर पोलिसांनी तिचा शोध घेत पुण्यातील कोथरूड येथे तिचे लोकेशन ट्रॅक केले. रात्रीच्या वेळी कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता या तरुणी आणि तिच्या तीन मैत्रिणींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. या तीन मैत्रिणी पुण्यात नोकरी करत असून कोथरूड परिसरात राहतात.
आरोपांनुसार, कोथरूड पोलीस ठाण्यातील रिमांड रूममध्ये या चौघींना पाच तासांहून अधिक काळ डांबून ठेवण्यात आले. यावेळी संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) कामटे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद भाषेचा वापर आणि शारीरिक मारहाण केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणींनी दावा केला आहे की, पोलिसांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत अश्लील टिप्पण्या केल्या, जसे की, “तुमची जातच तशी,” आणि “तुम्ही सगळ्या लेस्बियन आहात का?” याशिवाय, पीएसआय कामटे यांनी एका मुलीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडित तरुणींनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तासांहून अधिक काळ उलटल्यानंतरही कोथरूड पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. एवढेच नव्हे, तर पीडित तरुणींना वैद्यकीय तपासणीसाठी परवानगी देण्यासही नकार देण्यात आला. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या वकील परिक्रमा खोत यांनी सांगितले की, “पोलिसांनी पीडितांचे मानवी आणि कायदेशीर हक्क पायदळी तुडवले आहेत. तरीही, त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
या घटनेने पुण्यात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची दखल घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने चौकशीची मागणी केली आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटनांनी रात्री उशिरापर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून, पुणे पोलिसांनी अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे, पुणे शहराचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. त्यांच्या मते, संभाजीनगर येथील मिसिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी केवळ सहकार्य केले होते. त्यांनी दावा केला की, कोथरूड पोलीस ठाण्यात कोणताही छळ किंवा शिवीगाळ झाली नाही आणि चौकशी महिला सहाय्यता कक्ष आणि हिरकणी कक्षात पारदर्शकपणे पार पडली. मिसिंग मुलगी ट्रेस झाली असून तिला मुंढव्यातील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी असा दावाही केला आहे की, या प्रकरणात प्रथमदर्शनी कोणतेही तथ्य आढळले नाही, त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे शक्य नाही.
