बीड शहरातील साठे चौक परिसरात किरकोळ वादातून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. पिकअप वाहनाला मोटारसायकल आडवी लावून हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून तिघा अनोळखी तरुणांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी तरुणांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहन चालकाने मोटारसायकल आडवी लावल्यामुळे हॉर्न वाजवला होता. याच कारणावरून वाद सुरु झाला आणि वाद लवकरच मारहाणीमध्ये बदलला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यातील एकावर जिल्हा रुग्णालयात तर दुसऱ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हल्लेखोरांनी केलेल्या आक्रमक वर्तनामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. हल्लेखोर अद्याप ओळखले गेलेले नसून त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने तपास सुरु आहे.
या घटनेमुळे बीड शहरात पुन्हा एकदा सार्वजनिक सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली असून पोलिसांनी संबंधित गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे.
