इस्लामाबाद/बीजिंग, २८ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी रविवारी (२७ एप्रिल) पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक डार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत वांग यी यांनी पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष आणि आंतरराष्ट्रीय तपासणीच्या पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. मात्र, पाकिस्तान सरकारने या संभाषणाचा उपयोग करत भारताच्या संभाव्य कारवाईविरोधात जनतेला आणि लष्कराला बळ देण्यासाठी प्रचारतंत्र (प्रोपागंडा) सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानचा प्रचार आणि घबराट – पाकिस्तानी माध्यमांनुसार, सरकार आणि लष्करामध्ये भारताच्या संभाव्य सैन्य कारवाईची भीती पसरली आहे. या भीतीला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी नेतृत्वाने दावा केला आहे की, चीनने भारताविरोधातील कोणत्याही कारवाईत पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, ही विधाने घबराट पसरलेल्या जनतेला आणि लष्कराला खोटा दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे.
चीनची भूमिका आणि दोन्ही देशांना संयमाची सलाह -चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानुसार, वांग यी यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले, “चीन पहलगाम प्रकरणाच्या निष्पक्ष तपासणीचे समर्थन करतो आणि आशा करतो की दोन्ही देश तणाव कमी करण्यासाठी काम करतील.”
भारताची कठोर भूमिका – पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, केंद्र सरकारने याप्रकरणी कठोर पावले उचलली असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने तपास सुरू केला आहे. याशिवाय, भारताने १९६० च्या सिंधू जल कराराला तात्पुरती स्थगिती दिली आहे आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय नौदलानेही लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन करत आपली तयारी दाखवली आहे.
पाकिस्तानची खोटी आश्वासने – पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हल्ल्याची निष्पक्ष चौकशीची ऑफर दिली आहे. मात्र, भारताने या ऑफरला स्पष्टपणे नाकारले आहे. भारतीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली. भारताने २५ देशांच्या राजदूतांना पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचे पुरावे सादर केले असून, आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
