मुलाच्या लग्नासाठी स्वर्गवासी वडील पुन्हा पृथ्वीवर आले
सध्या AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येतो. काही दिवसांपूर्वी एका विवाहसोहळ्यात या तंत्रज्ञानाचा अनोखा आणि भावनिक वापर पाहायला मिळाला. या लग्नात वराच्या स्वर्गवासी वडिलांना स्क्रीनवर दाखवण्यात आले आणि असे भासवले गेले की ते प्रत्यक्ष लग्नाला उपस्थित आहेत. घरच्यांसोबत त्यांचा संवाद दाखवण्यात आला आणि त्यांनीही हा आनंद सोहळा ‘अटेंड’ केल्याचा आभास निर्माण करण्यात आला.
भावनिकदृष्ट्या पाहता, हे एक हृदयस्पर्शी दृश्य होते. ज्या कुटुंबाने आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे, त्यांच्यासाठी अशा प्रकारे त्या आठवणी पुन्हा जिवंत होणे हे सुखद आणि वेदनादायक दोन्ही असू शकते. मात्र, या गोष्टीमागे धार्मिक आणि सांस्कृतिक विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
हिंदू धर्म आणि मृत्यूची संकल्पना
हिंदू धर्मात मृत्यू म्हणजे आत्म्याचा देह त्याग करून पुढच्या प्रवासाला निघणे, असे मानले जाते. मृतदेहाला अग्नी देऊन पंचमहाभूतांमध्ये विलीन करण्याची परंपरा आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, जेव्हा व्यक्तीच्या अस्तित्वाशी संबंधित कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी ठेवली जाते, तेव्हा कुटुंबीय सतत त्या दुःखाच्या विळख्यात अडकून राहतात. त्यामुळे हिंदू परंपरेनुसार मृत व्यक्तीच्या स्मृतींना सन्मानाने मोकळीक देण्यासाठी वर्षातून एकदा पितृपक्षात त्यांच्या नावे अन्नदान करण्याची प्रथा आहे. यामुळे मृत आत्म्यास शांती मिळते आणि जिवंत कुटुंबीयांना मानसिक स्थैर्य लाभते.
AI तंत्रज्ञान आणि भावनेशी खेळ?
AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मृत व्यक्तीचे डिजिटल पुनरुत्पादन करणे म्हणजे त्याच्या मृत्यूची आठवण वारंवार जागवणे होय. ज्या जखमा हळूहळू भरून निघत असतात, त्या पुन्हा ताज्या होतात. भावनिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या लोकांसाठी ही एक मानसिक क्लेषदायक बाब ठरू शकते.
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही आठवणी जिवंत करता येतात, पण त्याचा उपयोग कशा प्रकारे करावा, हे आपणच ठरवायचे आहे. मृत व्यक्तीच्या आठवणी प्रेमाने साठवणे वेगळे आणि त्यांना कृत्रिमरित्या जिवंत भासवणे वेगळे. यामुळे श्रद्धेचा, परंपरेचा, आणि भावनांचा अनादर होण्याची शक्यता निर्माण होते.
AI चा योग्य उपयोग कसा व्हावा?
AI तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी त्याचा वापर संयमानं आणि जबाबदारीनं करावा. मृत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या आत्म्याच्या शांतीचा विचार करणे आवश्यक आहे. अशा गोष्टींमुळे कुटुंबीयांवर भावनिक ताण येऊ शकतो. म्हणूनच, मृत व्यक्तींच्या आठवणींना जागृत करण्याऐवजी त्यांच्यासाठी प्रार्थना करणे, त्यांच्या नावे पुण्यकर्म करणे आणि त्यांच्याशी जोडलेल्या चांगल्या गोष्टी पुढे नेणे अधिक योग्य ठरेल. तंत्रज्ञान हे आपले सेवक असावे, स्वामी नव्हे. AI च्या वापराने आपण भावना आणि संस्कृती यांचा समतोल साधला पाहिजे. भावनिक गुंतवणुकीच्या क्षणी आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करताना त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. म्हणूनच अशा कृत्रिम पद्धतींनी मृत व्यक्तींच्या आठवणी पुनरुज्जीवित करताना याचा आपल्या संस्कृतीवर आणि भावनांवर काय परिणाम होईल, याचा प्रत्येकाने नीट विचार करावा.
