News Information Entertainment

राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासून लष्करी प्रशिक्षण; दादा भुसे यांची घोषणा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई | ३ जून २०२५: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता पहिलीपासूनच मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काल केली. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त आणि नियमित व्यायामाची सवय निर्माण व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या प्रशिक्षणासाठी शाळांमधील क्रीडा शिक्षक, एनसीसीचे सदस्य, स्काऊट्स आणि गाईड्स यांच्यासोबतच निवृत्त सैनिकांची मदत घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सैनिकासारखी मानसिकता आणि शारीरिक क्षमतेचा पाया घालण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न केला जाणार आहे.

“देशभक्ती केवळ पुस्तकांत शिकवण्याएवजी प्रत्यक्ष कृतीतून रुजली पाहिजे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि राष्ट्रनिष्ठा वाढेल,” असं भुसे यांनी सांगितलं.

प्रशिक्षणाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी करण्यात येईल. हे प्रशिक्षण शारीरिक प्रशिक्षण, प्राथमिक शिस्त, परेड, योग, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक बाबींवर आधारित असेल.

राज्यभरात या उपक्रमाचे स्वागत होत असून, काही शिक्षणतज्ज्ञांनी या निर्णयाचे कौतुक केलं आहे. मात्र, काही संघटनांनी यावर अधिक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आवश्यक असल्याचं मत नोंदवलं आहे.

राज्य शासन लवकरच या उपक्रमासाठी कार्यपद्धती, प्रशिक्षण आराखडा आणि आवश्यक बजेट जाहीर करणार आहे.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा