News Information Entertainment

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ – भावनांनी भरलेला, थरारक अनुभव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असलेला आणि तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट लव फिल्म्सच्या मराठी सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
‘देवमाणूस’ मध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांसारख्या ताकदीच्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाची कथा अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भावनिक, रहस्यपूर्ण आणि गूढ यांचा मेळ असलेला ‘देवमाणूस’ एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट आहे. दमदार कथानक, उत्कंठा वाढवणारे प्रसंग आणि मनाला भिडणारे संगीत यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवेल.
चित्रपटातील दोन खास गाणी देखील सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. सोनू निगम यांच्या आवाजातील ‘पांडुरंग’ हे हृदयस्पर्शी भक्तिगीत, रोहन-रोहन यांचे संगीत आणि प्रसाद मडूपवार यांचे गीत असलेले हे गाणं श्रद्धा आणि भक्तीचा सुरेल संगम आहे. महेश मांजरेकर यांच्या वारी यात्रेतील भावनिक दृश्यांनी परिपूर्ण हे गाणे आध्यात्मिक आणि भावनिक दृष्टिकोनातून प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारे आहे. तर दुसरे गाणे ‘आलेच मी’ या लावणीमध्ये, सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसत आहे. तेजस देऊस्कर लिखित या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले असून बेला शेंडे आणि रोहन प्रधान यांच्या आवाजात ते सादर झाले आहे. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशीष पाटील यांच्या संकल्पनेत साकारलेली ही लावणी प्रेक्षकांना उत्साह आणि सौंदर्याचा अनुभव देणारी ठरत आहे.
दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “‘देवमाणूस’ हा माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नसून एक भावनिक प्रवास आहे. लव फिल्म्सने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि संपूर्ण टीमची मेहनत यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. ट्रेलरला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे दिसतेय. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”
निर्माते लव रंजन म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला आमची आदरांजली आहे. ‘देवमाणूस’ केवळ आमचा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवेश नाही, तर दर्जेदार आणि अर्थपूर्ण कथानक सादर करण्याचा संकल्प आहे.”
निर्माते अंकुर गर्ग यांचा विश्वास आहे की, “तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन आणि कलाकारांची सशक्त कामगिरी ‘देवमाणूस’ला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. आम्हाला या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान आहे.”
लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित ‘देवमाणूस’ २५ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा