हिंजवडी टेम्पो अपघात: हा घातपातच! चालकानेच आग लावल्याचा पोलिसांचा खुलासा
पुणे – हिंजवडी येथे झालेला टेम्पो अपघात हा अपघात नसून नियोजित घातपात असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यानुसार, टेम्पोच्या चालकानेच वाहनाला आग लावली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
टेम्पो चालकाचा काही कामगारांसोबत वाद होता त्यामुळे त्याने हा कट रचला आणि थिनरचा डबा ओतून काडी पेटवली आग लावली आणि स्वत: टेम्पोतून उडी मारली.
हा अपघात झाल्यानंतर सुरुवातीला तो तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासानंतर आणि घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजते. या बद्दल त्याच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील अचूक कारणे शोधण्यासाठी फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. हिंजवडी परिसरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून लवकरच अधिक माहिती देण्यात येणार आहे.
