पुणे, १४ एप्रिल २०२५: टिपू पठाण आणि त्याची गँग गेल्या काही वर्षांपासून सय्यद नगर, हांडेवाडी रोड आणि हडपसर परिसरात गुन्हेगारी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. खंडणी, जमीन बळकावणे, मारहाण आणि धमकावणे यांसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचा आरोप आहे. अलीकडेच, टिपू आणि त्याच्या साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी टिपू पठाण ऊर्फ रिझवान सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, एजाज युसूफ इनामदार आणि नदीम बाबर खान यांना अटक केली. या कारवाईला गती देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार केले होते
शनिवारी सायंकाळी, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली सय्यद नगर परिसरात टिपू आणि त्याच्या साथीदारांची धिंड काढली. ही धिंड स्थानिक नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि टिपूच्या दहशतीला आळा घालण्यासाठी काढण्यात आली. धिंडेदरम्यान पोलिसांनी टिपू आणि त्याच्या साथीदारांना परिसरात फिरवून जनतेला संदेश दिला की, पोलिस प्रशासन गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास तयार आहे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी यावेळी नागरिकांना उद्देशून सांगितले, “टिपू पठाण आणि त्याच्या गँगने अनेकांना धमकावून त्यांच्यावर दहशत निर्माण केली आहे. परंतु आता कोणीही घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला खंडणी, धमकी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास झाला असेल, तर निर्धास्तपणे काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि तक्रारीवर त्वरित कारवाई केली जाईल
