दोन हजार च्या दशकाच्या सुरुवातीला, दिल्लीच्या आसपासच्या परिसरात एक भयंकर रहस्य पसरलं होतं. टॅक्सी ड्रायव्हर्स एकामागून एक गायब होत होते. त्यांचे मृतदेह कधीच सापडत नव्हते, आणि पोलिसांना कोणताही पुरावा मिळत नव्हता. या गूढ गायब होण्यामागचं कारण शोधण्यासाठी दिल्ली आणि राजस्थान पोलिसांनी अनेक तपास पथकं स्थापन केली, पण प्रत्येक तपास एका अंधारात अडकत होता.
या सर्व प्रकरणांमागे एक मास्टरमाइंड होता, ज्याचं नाव होतं डॉ. देवेंद्र शर्मा; हा एका गुन्हेगारी टोळीचा मास्टरमाइंड होता, ज्याने 2000 ते 2005 या काळात किमान 50 टॅक्सी ड्रायव्हर्सच्या हत्या केल्या होत्या. या हत्यांचं वैशिष्ट्य असं होतं की, मृतदेह कधीच सापडत नव्हते. डॉ. देवेंद्र शर्मा ने आपल्या टोळीसोबत एक परिपूर्ण योजना आखली होती. त्याची टोळी टॅक्सी ड्रायव्हर्सना लक्ष्य करायची. रात्रीच्या वेळी, जेव्हा टॅक्सी ड्रायव्हर एकटे असायचे, तेव्हा टोळीचे सदस्य त्यांना बनावट प्रवासी म्हणून भेटायचे. ते ड्रायव्हरला सुनसान ठिकाणी नेऊन, त्याची हत्या करायचे. काही वेळाने डॉ. देवेंद्र स्वतः या हत्यांमध्ये सामील व्हायचा, असा संशय आहे की तो त्या मृत देहाचा किडनी रॅकेट साठी वापर करत असावा. त्याच्या सर्जन म्हणून असलेल्या कौशल्यामुळे तो हत्येच्या पद्धती अतिशय नियोजनबद्ध करायचा, ज्यामुळे पोलिसांना कोणताही पुरावा मिळणं कठीण व्हायचं.
मृतदेहांचा प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. देवेंद्रने एक भयंकर युक्ती शोधली होती. दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या एका खाडीत मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्याच्या टोळीचे सदस्य मृतदेह तिथे टाकायचे, आणि मगरी काही तासांतच सर्व पुरावे नष्ट करायच्या. या योजनेमुळे पोलिसांना मृतदेह सापडत नव्हते, आणि प्रकरणं अनसॉल्व्हड राहायची. 2005 मध्ये, एका टॅक्सी ड्रायव्हरच्या गायब होण्याच्या प्रकरणात पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला. एका संशयिताला पकडल्यानंतर, त्याने देवेंद्र शर्माचं नाव उघड केलं. पोलिसांना सुरुवातीला विश्वासच बसला नाही की एक प्रतिष्ठित डॉक्टर असा क्रूर गुन्हेगार असू शकतो. पण जसजसा तपास पुढे गेला, तसतसं देवेंद्र शर्माचे गुन्हेगारी कारनाम्यांचं जाळं उलगडत गेलं. त्याच्या टोळीतील काही सदस्यांनी पोलिसांना सर्व काही सांगितलं, आणि खाडीच्या परिसरात काही मृतदेहांचे अवशेष सापडले. देवेंद्राला 2006 मध्ये अटक करण्यात आली, आणि त्याच्यावर 50 हत्यांचा आरोप ठेवण्यात आला. कोर्टात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, आणि त्याला जयपूरच्या सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं. 2024 मध्ये त्याला वैद्यकीय कारणास्तव पॅरोल मिळाला. पण त्याने ही संधी साधली आणि पॅरोलच्या नियमांचं उल्लंघन करून पळून गेला. सहा महिन्यांपर्यंत तो पोलिसांना चकमा देत राहिला. तो दिल्लीत लपूनछपून राहत होता, आणि पुन्हा आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरू करण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांनी त्याचा माग काढला आणि बुधवारी, दिल्लीतल्या एका दाट लोकवस्तीतून त्याला पुन्हा अटक करण्यात आली. अशा नराधम हत्याराला फाशी ऐवजी जन्मठेप का दिली हा प्रश्न मात्र आमच्या मनात अनुत्तरीत राहिला.
