रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात बावनदीजवळ एक भीषण अपघात घडला. एक मिनी बस आणि एलपीजी (LPG) वायूची वाहतूक करणाऱ्या टँकरची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात मिनी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. बसमधील सुमारे २०-२२ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व जखमींना तात्काळ रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजी वायूची गळती सुरू झाल्यामुळे परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळावरून आवाहन केले आहे की, मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी बावनदी भागाकडे येऊ नये. प्रवाशांनी पाली आणि संगमेश्वर येथून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. वायुगळतीमुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
या अपघातात महामार्गाजवळची काही घरे, बागा आणि वाहनांचेही नुकसान झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलासह इतर आपत्कालीन सेवा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे










