ठाणे: मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आज (मंगळवार, ११ जून २०२५) सकाळी एका भीषण अपघातात चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून ही दुर्घटना घडली.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या तीन जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. तसेच, कळव्याच्या रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार, एका जखमीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. इतर जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची पाहणी केल्यानंतर, जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याचे सांगितले.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाडीतून दारात लटकून जाणारे प्रवासी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांना धडकल्याने हा अपघात झाला.
भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी रेल्वे बोर्डाने यापूर्वीच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सर्व गाड्या १५ डब्यांच्या करणे आणि स्वयंचलित दरवाजे बसवणे यांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली.
या दुर्घटनेबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.










