मुंबई : लंडनहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या विमानात प्रवासादरम्यान पाच प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स अचानक आजारी पडल्याची घटना घडली आहे. विमान प्रवासात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, अशी माहिती टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने दिली.
या सात जणांपैकी दोन प्रवासी आणि दोन केबिन क्रू मेंबर्स यांची प्रकृती उतरल्यावरही बरी झाली नव्हती. त्यामुळे विमान मुंबईत उतरल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी विमानतळावरील मेडिकल रूममध्ये नेण्यात आले. प्राथमिक तपासणी नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे एअर इंडियाने अधिकृत निवेदनात सांगितले आहे.
या घटनेची सखोल चौकशी सुरू असून सर्व संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांची व क्रू मेंबर्सची प्रकृती आता स्थिर असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे विमानातील इतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती, मात्र वैमानिक व क्रू मेंबर्सच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
