रत्नागिरी, ५ जून २०२५: रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, ३१ मेपासून आतापर्यंत एकूण ४ कारवायांमध्ये ३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रत्येकी एक अशा एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या कारवाईमध्ये रत्नागिरीत स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत १० ग्रॅम ब्राऊन हेरॉइन जप्त केले. अमली पदार्थविरोधी पथकांच्या सक्रियतेमुळे शहरात मोठी कारवाई झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
अन्य तीन कारवाया खेड तालुक्यात झाल्या आहेत. या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण तीन किलो २२८ ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त केला आहे. खेड तालुक्यातही अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री समाजात गंभीर समस्या निर्माण करत असल्याने, पोलिसांच्या या सततच्या कारवाया स्वागतार्ह आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.
